तुम्ही मेलात म्हणजे मेलात; दुसरा कोणताही जन्म नाही…?
सुमारे ३५०० वर्षांपूर्वी, जेव्हा जगातील अनेक समाज ईश्वराची संकल्पना शोधत होते, विविध धार्मिक विचार आकार घेत होते आणि आज आपण ज्यांना प्रमुख धर्म म्हणून ओळखतो, ते धर्म अस्तित्वातही आलेले नव्हते…
यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम हे धर्म जगात अस्तित्वात येण्याच्याही कितीतरी आधी, त्यांच्यापेक्षा दीड-दोन हजार वर्षे अगोदर, चार्वाकासारखी विचारधारा अस्तित्वात असणे ही काही सामान्य बाब नव्हती!
चार्वाक अथवा लोकायत ही एक प्रभावी वैचारिक परंपरा होती. या परंपरेत बृहस्पतींना प्रमुख आचार्य मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या मूळ साहित्यापैकी संपूर्ण साहित्य आज उपलब्ध नसले, तरी त्यातील काही विचार आणि संदर्भ आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. त्या काळात माणूस असे म्हणत होता;
“कोणताही ईश्वर नाही. कोणताही सर्वशक्तिमान परमेश्वर नाही. तुमचा दुसरा जन्मही नाही. तुम्ही मेलात म्हणजे मेलात—त्यानंतर काहीही नाही.”
आणि ही संपूर्ण सृष्टी, हे विश्व स्वतःच्या नैसर्गिक प्रक्रियेनुसार चालत आहे. त्यातील घडामोडी, संघर्ष, परस्परसंवाद आणि बदल यांच्या प्रक्रियेतून काही नैसर्गिक नियम आपोआप आकाराला आले. हे विश्व चालविण्यासाठी कुठेतरी बसलेला कोणी नियंत्रक आहे, त्यावर सतत लक्ष ठेवणारा कोणी आहे किंवा प्रत्येक गोष्ट घडवून आणणारी एखादी अदृश्य सत्ता आहे असे मानण्याची आवश्यकता नाही, अशी त्यांची विचारधारा होती.
विचार करा, सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारचे चिंतन अस्तित्वात होते. आणि एवढेच नव्हे, तर असे विचार मांडणाऱ्या माणसाला त्याच्या मतांमुळे कोणी तलवारीने ठार मारले नाही. त्याच्यावर टीका झाली, त्याच्या विचारांना तीव्र विरोधही झाला; परंतु तरीही तो विचार टिकून राहिला. तो केवळ एखाद्या व्यक्तीचा क्षणिक विचार नव्हता; ती एक स्वतंत्र विचारधारा होती.
“मृत्यूनंतर काय?” मानवी संस्कृतीच्या इतिहासातील कदाचित सर्वांत प्राचीन, सर्वांत अस्वस्थ करणारा आणि तरीही सर्वांत चिरंतन प्रश्न!
माणसाने आकाशाकडे पाहिले आणि देवाची कल्पना केली. मृत्यू पाहिला आणि अमरत्वाची आशा निर्माण केली. दुःख अनुभवले आणि त्यामागे कर्म शोधले. अनिश्चिततेची भीती वाटली आणि नियतीची संकल्पना उभी केली. परंतु याच प्राचीन भारतात काही विचारवंत असेही होते, ज्यांनी या साऱ्याच्या अगदी विरुद्ध दिशेने पाहण्याचे धाडस केले.
त्यांनी विचारले:
“ईश्वर आहे, याचा पुरावा काय? आत्मा अमर आहे, हे आपल्याला कसे माहीत? पुनर्जन्म होतो, हे कोणी पाहिले? स्वर्ग आणि नरक प्रत्यक्ष अनुभवले कोणी?”
आणि या प्रश्नांमधून भारतीय तत्त्वज्ञानाच्या विशाल प्रवाहात एक विलक्षण विद्रोही विचारपरंपरा उभी राहिली. आणि ती म्हणजे चार्वाक! लोकायत!
श्रद्धेपेक्षा प्रश्न मोठा ! चार्वाकाचे महत्त्व केवळ त्याने ईश्वर नाकारला यात नाही. ईश्वर नाकारणे हेही शेवटी एक विधान आहे. चार्वाकाच्या विचाराचे खरे क्रांतिकारक स्वरूप त्याच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत आहे. जे सांगितले जाते ते केवळ परंपरेने सांगितले जाते म्हणून स्वीकारायचे का? एखादा ग्रंथ प्राचीन आहे म्हणून त्यातील प्रत्येक विधान अंतिम सत्य मानायचे का? बहुसंख्य लोक एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात म्हणून ती वस्तुनिष्ठ सत्य ठरते का? मानवी बुद्धीला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का? याच ठिकाणी चार्वाक भारतीय विचारविश्वात विलक्षण आधुनिक भासतो. त्याचा आग्रह साधा, परंतु प्रस्थापित व्यवस्थेला अस्वस्थ करणारा होता.
“जे आहे, त्याकडे पाहा. जे अनुभवता येते, त्याची चिकित्सा करा आणि ज्याचा पुरावा नाही, त्याबद्दल प्रश्न विचारण्याचे धैर्य ठेवा.”
मृत्यू म्हणजे पूर्णविराम? मानवी मनाला मृत्यू स्वीकारणे कधीच सोपे गेले नाही. आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती एका क्षणी अस्तित्वात असते आणि दुसऱ्या क्षणी नसते हे वास्तव इतके कठोर आहे की माणसाने त्यापलीकडे अनेक कल्पना उभ्या केल्या. आणि त्या म्हणजे आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नर्क, मोक्ष, परलोक, इ.
चार्वाकाने मात्र या सांत्वनाच्या कल्पनांसमोर अत्यंत कठोर प्रश्न उभा केला. “त्यांचा प्रत्यक्ष पुरावा कुठे आहे?” त्याच्या विचाराचा आशय अत्यंत स्पष्ट होता: “देह नष्ट झाल्यानंतर स्वतंत्र आत्म्याचे अस्तित्व टिकून राहते, पुनर्जन्म होतो किंवा मृत्यूनंतर दुसरे जीवन सुरू होते असे मानण्यासाठी पुरेसा अनुभवाधिष्ठित आधार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, “तुम्ही मेलात म्हणजे मेलात; दुसरा कोणताही जन्म आहे, असे मानण्याचे कारण काय?” हे वाक्य प्रथमदर्शनी भयावह वाटू शकते. पण त्यामागे एक विलक्षण जीवनदृष्टी दडलेली आहे. जर दुसरा जन्म नसेल, तर हाच जन्म अनमोल ठरतो. जर मृत्यूनंतरचे काल्पनिक जीवन निश्चित नसेल, तर आजचे वास्तव जीवन अधिक महत्त्वाचे ठरते. आणि जर स्वर्गाची हमी नसेल, तर पृथ्वीवरील माणसाचे दुःख कमी करण्याची जबाबदारी अधिक मोठी ठरते.
विश्वाला नियंत्रकाची आवश्यकता आहेच का? मानवाला प्रत्येक घटनेमागे कोणीतरी कर्ता शोधण्याची सवय आहे. घर आहे, म्हणजे बांधणारा असणार. चित्र आहे, म्हणजे चित्रकार असणार. मग विश्व आहे, म्हणून त्याचा निर्माता असलाच पाहिजे. परंतु चार्वाकीय भौतिकवादी विचार या तर्कालाच प्रश्न विचारतो. “निसर्गातील प्रत्येक प्रक्रियेमागे मानवी अर्थाने एखादी जाणीवपूर्वक इच्छा असलीच पाहिजे का?” पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, भौतिक घटकांच्या परस्परसंयोगातून जगातील विविध रूपे निर्माण होऊ शकत नाहीत का? विश्वातील घटना नैसर्गिक कारणांनी घडत असतील, तर प्रत्येक घटनेमागे अदृश्य हस्तक्षेपाची कल्पना करणे आवश्यक आहे का?”
आज आधुनिक विज्ञान विश्वाचे स्पष्टीकरण गुरुत्वाकर्षण, उत्क्रांती, पदार्थ, ऊर्जा, अवकाश-काल आणि नैसर्गिक नियमांच्या भाषेत करते. चार्वाक आधुनिक विज्ञान जाणत नव्हता; त्यामुळे त्याला आजच्या विज्ञानाचा पूर्वज ठरविणेही इतिहासावर अन्याय ठरेल. पण निसर्गाचे स्पष्टीकरण निसर्गातच शोधण्याची त्याची वृत्ती विलक्षण महत्त्वाची होती. हीच त्याच्या विचारातील खरी आधुनिकता आहे.
बृहस्पती—व्यक्ती की परंपरेचे प्रतीक? चार्वाक-लोकायत परंपरेचा संबंध परंपरेने बृहस्पती यांच्याशी जोडला जातो आणि म्हणून तिला बार्हस्पत्य असेही संबोधले गेले. परंतु येथे इतिहास आणि आख्यायिका यांच्यातील सीमा लक्षात घेणे आवश्यक आहे. बृहस्पती नेमके कोण होते, ते ऐतिहासिक व्यक्ती होते की परंपरेने दिलेले प्रतीकात्मक आचार्य, आणि त्यांच्या नावावर सांगितल्या जाणाऱ्या सूत्रांचे मूळ स्वरूप काय होते? या प्रश्नांची निर्विवाद उत्तरे आज उपलब्ध नाहीत. चार्वाकांचे मूळ सूत्रग्रंथ आणि त्यांवरील भाष्ये आज संपूर्ण स्वरूपात उपलब्ध नाहीत. त्यांचे विचार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बौद्ध, जैन आणि ब्राह्मण तत्त्वचिंतक विरोधकांनी केलेल्या उल्लेखांतून, उदाहरणातून आणि खंडनांतून आपल्यापर्यंत आले आहेत. ही बाब विलक्षण आहे.
ज्यांचे स्वतःचे ग्रंथ हरवले, त्यांचे विचार त्यांच्या विरोधकांच्या ग्रंथांतून जिवंत राहिले! विचारांच्या इतिहासातील याहून मोठा विरोधाभास कोणता? चार्वाक म्हणजे केवळ “खा, प्या, मजा करा” नव्हे. चार्वाकाला अनेकदा अत्यंत सोप्या आणि काहीशा उपहासात्मक पद्धतीने मांडले जाते. कर्ज काढा, तूप प्या आणि आयुष्याची मजा करा. परंतु संपूर्ण चार्वाक परंपरेला केवळ बेफिकीर भोगवादात बंदिस्त करणे हा तिच्यावर अन्याय ठरेल. चार्वाकाचे अधिक मूलभूत योगदान वेगळे आहे. ते आहे की,‘प्रमाणाचा प्रश्न, ज्ञानाच्या विश्वसनीयतेचा प्रश्न, प्रत्यक्ष अनुभवाचे महत्त्व, धार्मिक अधिकाराच्या चिकित्सेचा अधिकार आणि अलौकिक दाव्यांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य.’
चार्वाकाने भारतीय बुद्धिवादाला एक अस्वस्थ करणारा प्रश्न दिला, तो म्हणजे “तुम्ही जे सत्य म्हणता, ते सत्य आहे हे मी कशावरून मानायचे?” हा प्रश्न आजही संपलेला नाही.
भारतीय संस्कृतीची खरी विशालता म्हणजे चार्वाकाचे अस्तित्व आणखी एका कारणासाठी महत्त्वाचे आहे. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ वेद, उपनिषदे, आत्मा, ब्रह्म, ईश्वर, कर्म आणि मोक्ष एवढेच नाही. या भूमीवर वेदान्त आहे, सांख्य आहे, योग आहे, न्याय आहे, वैशेषिक आहे, मीमांसा आहे; बौद्ध आणि जैन चिंतन आहे आणि त्याचबरोबर ईश्वर, वेदप्रामाण्य, परलोक आणि पुनर्जन्म यांनाच आव्हान देणारी चार्वाक-लोकायत परंपराही आहे. म्हणून भारतीय विचारपरंपरेची महानता सर्वांनी एकच सत्य मानले यात नाही. तिची महानता अशी आहे की एकाच भूमीवर परस्परविरोधी सत्यदावे शतकानुशतके एकमेकांशी वाद घालत राहिले. कोणी म्हणाले, “आत्मा शाश्वत आहे!”. कोणी म्हणाले, “अनात्म आहे !” कोणी म्हणाले, “ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे!” आणि तो उठून म्हटला, “मला प्रथम त्याचा पुरावा दाखवा!” ही केवळ नास्तिकता नव्हती. ही बौद्धिक निर्भयता होती.
विचाराला उत्तर विचाराने: चार्वाकावर प्रचंड टीका झाली. बौद्ध, जैन, वेदान्ती, नैयायिक आणि इतर अनेक तत्त्वपरंपरांनी त्याच्या भूमिकांचे खंडन केले. पण नेमकी हीच गोष्ट महत्त्वाची आहे. चार्वाकाचे उत्तर देण्यासाठी भारतीय तत्त्वज्ञांना अधिक सूक्ष्म युक्तिवाद करावे लागले. ज्ञान म्हणजे काय? प्रमाण म्हणजे काय? अनुमान विश्वसनीय कसे ठरते? आत्म्याचे अस्तित्व कसे सिद्ध करायचे? ईश्वराच्या अस्तित्वासाठी कोणता तर्क द्यायचा? या प्रश्नांवर अधिक खोल विचार करावा लागला. म्हणजे विरोधक असूनही चार्वाकाने भारतीय तत्त्वज्ञान समृद्ध केले. कारण, प्रश्न विचारणारा माणूस केवळ उत्तराला आव्हान देत नाही; तो उत्तर देणाऱ्यालाही अधिक बुद्धिमान बनण्यास भाग पाडत असतो.
चार्वाक जिंकला की हरला? हा प्रश्नच कदाचित चुकीचा आहे. तत्त्वज्ञानाचे युद्ध निवडणुकीसारखे नसते. तेथे मतांची संख्या अंतिम सत्य ठरवत नाही. चार्वाकाची प्रत्येक भूमिका स्वीकारण्याची आवश्यकता नाही. त्याच्या ज्ञानमीमांसेवर गंभीर आक्षेप घेता येतात. प्रत्यक्ष अनुभवाला दिलेले अत्यधिक महत्त्व, अनुमानाविषयीचा संशय आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या काही नैतिक भूमिका यांची चिकित्सा होऊ शकते आणि झालीही आहे. पण चार्वाकाचे ऐतिहासिक महत्त्व त्याची प्रत्येक गोष्ट बरोबर होती म्हणून नाही. तर त्याचे महत्त्व आहे कारण त्याने प्रश्न विचारण्याचा अधिकार सोडला नाही. आणि कदाचित म्हणूनच हजारो वर्षांच्या भारतीय बौद्धिक प्रवासानंतरही चार्वाक आपल्याला अस्वस्थ करतो. तो आजही आपल्या कानात विचारतो, “तू हे का मानतोस? तुझ्याकडे त्याचा पुरावा काय आहे? तू स्वतः विचार केला आहेस, की तुला जे सांगितले गेले तेच तू सत्य मानलेस?” आणि कदाचित कोणत्याही महान तत्त्वज्ञानाचे अंतिम कार्य हेच असते. आपल्याला तयार उत्तरे देणे नव्हे, तर आपल्या तयार उत्तरांवर प्रश्न विचारायला शिकवणे. ईश्वर आहे की नाही? आत्मा आहे की नाही? पुनर्जन्म आहे की नाही? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने आपल्या श्रद्धा, बुद्धी आणि अनुभवानुसार शोधावीत.
पण चार्वाकाने भारतीय विचारविश्वाला दिलेली एक देणगी निर्विवादपणे मौल्यवान आहे ती म्हणजे श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य जितके पवित्र, तितकेच प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्यही पवित्र असले पाहिजे. आणि म्हणूनच चार्वाक हा केवळ प्राचीन भारतातील एक नास्तिक आवाज नाही. तो मानवी बुद्धीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन करणारा एक प्राचीन विद्रोही स्वर आहे. काळ बदलतो, धर्म बदलतात, साम्राज्ये जन्माला येतात आणि नष्ट होतात, ग्रंथ हरवतात, परंपरा विस्मृतीत जातात, पण प्रश्न मात्र सदैव जिवंत राहतात. आणि जोपर्यंत मनुष्याला प्रश्न विचारण्याची इच्छा आहे, तोपर्यंत कुठेतरी कुठल्या ना कुठल्या रूपात चार्वाकही जिवंत राहील.


Leave a Reply